गुरुवार, ६ नोव्हेंबर
सर्व गोष्टींसाठी आभार माना.—१ थेस्सलनी. ५:१८.
प्रार्थनेत यहोवाचे आभार मानण्याची कितीतरी कारणं आपल्याकडे आहेत. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो. कारण शेवटी प्रत्येक चांगली देणगी देणारा तोच आहे. (याको. १:१७) उदाहरणार्थ, या सुंदर पृथ्वीसाठी आणि सृष्टीतल्या अद्भुत गोष्टींसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो. याशिवाय आपल्याला जीवन दिल्याबद्दल तसंच कुटुंब, मित्र आणि एक सुंदर आशा दिल्याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाने आपल्याला त्याच्यासोबत मैत्री करण्याची संधी दिली याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. यहोवाने खास माझ्यासाठी काय केलं आहे आणि त्याबद्दल मला त्याचे आभार कसे मानता येतील याचा विचार करण्यासाठी कदाचित आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. आपण अशा जगात जगत आहोत जिथे कोणीही उपकाराची जाणीव ठेवत नाही. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कदर बाळगण्याऐवजी लोक सहसा आपल्याला आणखी काय-काय पाहिजे याचाच जास्त विचार करतात. आपलीही वृत्ती अशीच झाली तर आपल्या प्रार्थना, विनंत्यांची एक मोठी यादीच बनून जाईल. आपण जर काळजी घेतली नाही तर आपणही त्यांच्यासारखेच होऊ शकतो. आणि मग प्रार्थनेत यहोवाचे आभार मानण्याऐवजी प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आपण त्याच्याकडे विनंतीच करत असू. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून यहोवा आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे आणि ती व्यक्तही केली पाहिजे.—लूक ६:४५. टेहळणी बुरूज२३.०५ ४ ¶८-९
शुक्रवार, ७ नोव्हेंबर
मनात कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने मागत राहा.—याको. १:६.
यहोवा एक प्रेमळ पिता असल्यामुळे त्याला आपण त्रासात असलेलं कधीच बघवत नाही. (यश. ६३:९) पण तरीसुद्धा नद्या आणि आगीच्या ज्वालांसारख्या आपल्यावर येणाऱ्या सगळ्याच परीक्षांमधून तो आपल्याला वाचवत नाही. (यश. ४३:२) पण या परीक्षांना तू “ओलांडशील” असं अभिवचन मात्र तो आपल्याला देतो. कोणत्याही समस्येमुळे किंवा परीक्षांमुळे तो कधीच आपलं कायमचं नुकसान होऊ देणार नाही. तसंच येणाऱ्या परीक्षांना आपल्याला धीराने तोंड देता यावं म्हणून तो त्याची पवित्र शक्तीसुद्धा देतो. (लूक ११:१३; फिलिप्पै. ४:१३) त्यामुळे परीक्षांना धीराने सहन करायला आणि विश्वासू राहायला ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे अगदी त्याच गोष्टी तो आपल्याला पुरवेल अशी खातरी आपण ठेवू शकतो. आपण यहोवावर भरवसा ठेवावा अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (इब्री ११:६) आपल्यावर येणाऱ्या परीक्षांमुळे कधीकधी आपण भारावून जाऊ शकतो. इतकंच काय तर यहोवा आपल्याला मदत करेल की नाही अशीसुद्धा शंका आपल्या मनात येऊ शकते. पण बायबल याची खातरी देतं की देवाच्या सामर्थ्याने आपण “तट ओलांडू शकतो.” (स्तो. १८:२९) त्यामुळे अशा शंकांना बळी पडण्याऐवजी आपण पूर्ण विश्वासाने यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर नक्की देईल असा भरवसा ठेवला पाहिजे.—याको. १:६, ७. टेहळणी बुरूज२३.११ २२ ¶८-९
शनिवार, ८ नोव्हेंबर
प्रेमाच्या ज्वाला धगधगत्या आगीसारख्या आहेत. ती याहची ज्वाला आहे. पाण्याचे लोट प्रेमाला विझवू शकत नाहीत आणि नद्या त्याला बुडवू शकत नाहीत.—गीत. ८:६, ७.
खऱ्या प्रेमाचं हे किती सुंदर वर्णन आहे. पती-पत्नींनो तुमच्यामध्ये कधीही न मिटणारं प्रेम असू शकतं याची खातरी या शब्दांमधून मिळते. एका जोडप्यामधलं प्रेम शेवटपर्यंत टिकेल की नाही हे त्यांच्यावरच अवलंबून असतं. उदाहरणार्थ, एखादी शेकोटी कायम जळत राहू शकते, पण त्यासाठी त्यामध्ये कायम लाकडं टाकत राहावी लागतील. असं केलं नाही तर शेकोटी हळूहळू विझून जाईल. त्याचप्रमाणे, पती-पत्नीमधलं प्रेमही शेवटपर्यंत टिकून राहू शकतं, पण त्यासाठी त्यांना आपल्या नात्याला खतपाणी घालत राहावं लागेल. काही वेळा एखाद्या जोडप्याला जाणवेल, की त्यांचं आपसातलं प्रेम कमी होत चाललंय. खासकरून आर्थिक संकटाचं, आरोग्याच्या समस्यांचं किंवा मुलांना वाढवायच्या जबाबदारीचं दडपण असतं तेव्हा. म्हणून “याहची ज्वाला” जर जिवंत ठेवायची असेल, तर पती-पत्नी दोघांनीही यहोवासोबतचं त्यांचं नातं मजबूत ठेवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०५ २०-२१ ¶१-३